Melodies of Freedom | Azadi Ka Amrit Mahotsav, Ministry of Culture, Government of India

Melodies of Freedom Detail

Azadi Geet of Maharashtra

आधी नमन महाराष्ट्राला
शिवाजी राजाला
जिजाऊ माँ साहेबाला
स्वराज्याचं बांधलं तोरण
स्वातंत्र्याचं घातलं धोरण
वंदितो त्यांच्या कार्याला
जी जी जी

धन्य धन्य भूमी महाराष्ट्राची हो ss हो
संत महतांची, शूरवीरांची
काळ्या कातळात लढणाऱ्या मावळ्यांची
त्या भूमीचा पराक्रम गाऊ जी जी जी

तलवारीची पाती जिथे खणखणाट करती
ढालीचे प्रतिकार उमटती योद्धे रक्त सांडती
जी जी जी र जी जी
मायभूच्या रक्षकांची आज गाऊ कीर्ती
स्वातंत्र्यास देह अर्पूनी ज्यांनी दिली आहुती
जी जी रं जी

 -  " सन १८१८ सालाला
काय घडलं भीमा कोरेगावला
भेदभावाचं राज्य करणाऱ्या पेशवाईला
महार पलटणीने धडा शिकविला "

बुडाली  सत्ता पेशव्यांची
शनिवार वाड्याची
उतरला जरीपटका खाली जी जी खाली जी
जरीपटका उतरून खाली
युनियन जॅक लागला जी जी
इंग्रजशाही आली जी जी  जी

" काळाच्या पोटामधी मोठा बदल झाला
तराजू हाती घेतलेला साहेब
त्यात देशाला तोलू लागला
काळ गेला तशी वेळ गेली
इंग्रज साहेबही देशच लुटू लागला "

आणि तिकडं काय घडलं उत्तरेला

झालं बंड १८५७ सालाला
इंग्रज सत्ता उलथण्याला
हिंदी सैनिकांनी
एल्गार पुकारिला
मंगल पांडेचं बलिदान
झालं कारण त्याला
जी जी जी जी जी

झलकारी बाई झाशीची
राणी लक्ष्मीबाईच्या साथीला
तात्या टोपेच्या लढ्याला
नाना पेशवा होता सोबतीला
बहादूर शहा जफर झाला
तयार लढ्याला
जी जी जी जी

 - " १८५७ चं बंड फसलं पण स्वातंत्र्याची आग पेटली. देशभर आदिवासींनी देखील मोठमोठे लढे दिले, अनेक आदिवासी त्यात मारले गेले... ब्रिटिश सत्ता हादरवली...पुढे १९४२च्या आंदोलनाचा धडा इंग्रजांना बसला आहे..."

"१८५७ नंतरच्या अत्यंत गंभीर अशा बंडाचा सामना मला सध्या करावा लागतो आहे. या बंडाचे गांभीर्य व त्याची व्याप्ती लष्करी सुरक्षिततेच्या हेतूने आम्ही आजवर जगापासून लपवून ठेवली आहे...'"-
अशा शब्दात १९४२ मधील हिंदुस्तानचे ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो या
तत्कालिन हिंदुस्तानच्या सर्वोच्च इंग्रज अधिकाऱ्याने 'चले जाव' उठावासंबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

चाल-

चले जावची झाली
घोषणा मुंबईला
नऊ ऑगस्टला
गवालिया टॅंक मैदानाला
साऱ्या शक्तीनिशी प्रतिकार करा
इंग्रजांचे मुख्य कारभार बंद पाडा
नेते वदले या वचनाला
सारे देशभक्त पेटले त्या वक्ताला
जी जी जी

कुणी जाळितो कोर्ट कचेऱ्या
कुणी करतो जेलच्या वाऱ्या
लुटले खजिने तोडल्या तारा
तुरुंग फोडून बसवला दरारा
 इंग्रजाचा केला बोजवारा
जी जी जी जी

 उखडिले रूळ जागोजागी
 रेल्वे उलटिल्या लाविल्या आगी
 जेरीस आणला इंग्रज साहेबाला
सळो की पळो केला त्याला
त्याचा घाम काढियेला
देशभक्तांनी वचपा काढियेला जी जी जी
छोडो भारतचा देऊन नारा
देश उठवला जी जी जी
देश जागविला जी जी  

धुळे मुक्कामी भागाला
चाळीसगाव डांगणाला
क्रांतिकारक जमा झालेला
साने गुरुजी देती आवाजाला
अवघा खानदेश त्यांनी उठविला
त्यांनी उठविला जी जी जी

वाघळी नि वाघोडा स्टेशनला
रेल्वे खाली पाडियेल्या
काळाचा महिमा असला
मवाळही जहाल झालेला
अशी झाली मात
झाली खैरात
बंडाची जी जी जी जी 

नाना पाटील होते धाटणीला
बापू लाड होते आखणीला
धुळ्याजवळ चिमठाण्याला
लुटलं पगारी खजिन्याला
लुटी करून इंग्रजाला
केलं हैराण त्या वक्ताला
जी जी जी
हैराण जी जी जी

मुलुख साताऱ्यात झाला चमत्कार
नाना पाटलांचं प्रतिसरकार
न्यायनिवाडा चालविला
दिला पर्याय इंग्रज सत्तेला
गावोगाव गवगवा झाला
कोणी घाबरेना इंग्रजाला
जी जी जी

चाल-
नाना पाटलाचा पटका रे
जुलूमाला दिला झटका रे
जुलूमाला दिला झटका रे

क्रांतीसिंहांची गर्जना झाली
गाजून गेली डोंगरजाळी
उन्हात पाण्याचा मटका रे
नाना पाटलाचा पटका रे
जुलूमाला दिला झटका रे

सातारमुक्कामी फाशीच्या वडाला,
पुन्हा वडूज गावाला गारगोटीला
इंग्रज मारितो देशभक्ताला
घालतो गोळ्या
दिवसाढवळ्या
पण होईना शांत ती आग
चहुबाजुनी पेटला राग
लोक मागती स्वातंत्र्याला
जी जी जी जी

वासुदेव फडके नि उमाजी नाईक
एकेक होता पाईक
बाबू गेनू, राजगुरू बंदा
बलिदान केलेलं खंदा
शिरीषकुमार राजबिंडा
भिडला मातब्बर पुंडा
रोवला स्वातंत्र्य झेंडा जी जी जी

परंपरा मोठी थोर
इंग्रजास होता घोर
खाली लढा नाही जाणार
देश महाराष्ट्र गाजणार
गोखले,टिळक, आगरकर
नि पुढे झाले आंबेडकर
जी जी
महाराष्ट्र धन्य भूमी
स्वातंत्र्य मिळे हुकमी
जी जी जी जी जी

स्वातंत्र्याचं गाणं गातं
महाराष्ट्र संगीत हो महाराष्ट्र संगीत...
डफ वाजतो
हलगी कडकडे
घुमतो पोवाडा
गाजे स्वातंत्र्य चौघडा जी जी रं जी जी

गावोगावी उभे आजही
हुतात्मा स्मारक
दिमाखात उभे हुतात्मा स्मारक
वीट रचते कुणी वृद्धा
आजही त्याच जोशात
स्वातंत्र्याच्या त्याच जोशात जी जी जी रं जी जी
नमन माझे संतोषाचे त्या त्यागी जीवास
स्वातंत्र्य सैनिक जिथे जाहले त्या भूमीस
जी जी रं जी जी

Top